सांगली : शहरातील वखारभाग येथील जैन बस्ती परिसरात घरजागेच्या वादातून पिता- पुत्रास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी विद्याधर शिवकुमार मगदूम (रा. प्रताप टॉकीजजवळ, वखार भाग, सांगली) यांनी सचिन सुरेंद्र मिणचे (रा. विकास चौक, विश्रामबाग), इंद्रजित वसंत मिणचे (रा. नेमीनाथनगर, सांगली) यांच्यासह अन्य आठ ते दहा जणांविरोधात सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व संशयितांमध्ये घरजागेवरून वाद आहे. संशयितांनी जेसीबी मशीन आणत वखार भाग येथील घर पाडण्यास सुरुवात केली होती. यावेळी याचा वाद न्यायालयात असल्याने घर पाडता येणार नाही, असे मगदूम यांनी सांगितले. यावर वाद होत संशयितांनी अंगावर धावून येत मगदूम व त्यांचा मुलगा केदार यास बेदम मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.