सांगली : महाराष्ट्र उर्वरित वैधानिक विकास महामंडळास शंभर कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगली, मिरज कुपवाड महापालिकेच्या शेरीनाल्यासाठी बारा कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, उर्वरित वैधानिक विकास महामंडळांतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. या महामंडळासाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरण व स्वच्छतेची कामे करुन घेता येतील. यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. प्रस्ताव आल्यानंतर निधी वर्ग करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. शेरीनाल्याच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बारा कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच चाचणीही घेण्यात येईल. यामुळे लवकरच शेरीनाल्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. महापालिका क्षेत्रामध्ये पाच आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. (प्रतिनिधी)
शेरीनाल्यासाठी बारा कोटी मंजूर
By admin | Updated: July 5, 2014 00:32 IST