इस्लामपूर : पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पैशाचा गैरवापर करुन शहरातील जनतेला गुलाम बनविले आहे. ३१ वर्षांची सत्ता उलथवून टाकताना मतदारांनी पवित्र मत न विकता, विचार करुन मतदान करावे. जनतेच्या झंझावातापुढे अनेक बलाढ्य शक्ती नेस्तनाबूत झाल्या आहेत. या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील शिवाजी पुतळ्यासमोर जाहीर सभा झाली. या सभेत निशिकांत पाटील बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, विक्रम पाटील, राहुल महाडिक, बाबासाहेब सूर्यवंशी, सम्राट महाडिक, सरपंच गौरव नायकवडी, अरुण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.निशिकांत पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी शहरातील विकास कामांमध्ये ६0 टक्क्यांपर्यंत कमिशन घेतल्याने, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. विकास आराखड्यातील आरक्षणापासून सत्ताधाऱ्यांच्या मोठ्या जमिनी मुक्त आहेत. मात्र सामान्यांच्या गुंठा, दोन गुंठा जमिनी आरक्षित झाल्या आहेत. या विकास आराखड्याच्या सॅटेलाईटला किल्ली कोणी दिली, याचा शोध घ्यावा लागेल.सदाभाऊ खोत म्हणाले, निशिकांतदादा अनेक वर्षे राष्ट्रवादीत होते. त्यामुळे सॅटेलाईटला किल्ली कोणी दिली, हे त्यांनी मतदारांना सांगावे. त्या किल्ल्या मतदार आपल्या हातात देतील. पालिकेकडून पाण्याचे कनेक्शन संध्याकाळची सोय केल्याशिवाय मिळत नाही. इस्लामपूरच्या जनतेला गुंडगिरी नव्हे, तर शांतता हवी आहे. विकास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने रस्ते, घरकुलांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने निधी आणू. एका वर्षात शहराचा विकास करुन दाखवू.आ. शिवाजीराव नाईक म्हणाले, सर्वांनी एकदिलाने बलाढ्य शक्तीला टक्कर दिली, तर मोठे यश मिळते. राज्यात व देशात भाजपची सत्ता असल्याने इथेही सत्ता द्या, विकास काय असतो हे आम्ही दाखवतो.नानासाहेब महाडिक म्हणाले, निवडणुकीचा निकाल काय लागणार याची साक्ष ही गर्दी देत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते विकास आघाडीत येत आहेत. कोट्यवधीचा निधी कोणाच्या खिशात गेला, हे शोधून काढावे लागेल. यावेळी विक्रम पाटील, राहुल महाडिक, अरुण कांबळे, गौरव नायकवडी यांचीही भाषणे झाली. विजय कुंभार यांनी आभार मानले. सभेला वैभव पवार, कपिल ओसवाल, महेश पाटील, एल. एन. शहा, सागर खोत, अमित ओसवाल, सतीश महाडिक, अजित पाटील, विजय पवार, आप्पासाहेब पाटील, जलाल मुल्ला, सनी खराडे, अॅड. फिरोज मगदूम उपस्थित होते. (वार्ताहर)चंगू-मंगू आणि बाकडंनिशिकांत पाटील यांनी पालिकेतील बाकड्याची गोष्ट सांगितली. या बाकड्यावर दोन्ही बाजूला चंगू—मंगू असतात आणि मध्ये एकजण बसलेला असतो. त्या चेहऱ्याला लोक कंटाळलेत. हा चेहरा पाहिला की काम होत नाही, अशी भावना पसरल्याने पालिकेत कोणीच जात नाही. तुम्हाला ७0 वर्षांचा उमेदवार हवा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.लक्षवेधी नव्हे, एकतर्फीचबाबासाहेब सूर्यवंशी म्हणाले, ‘आम्ही तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे विरोधक डगमगले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कितीही मोठ्या अंगाचा पैलवान असू दे, आमचा पैलवान त्याला चारीमुंड्या चित करणारच. ही लढत लक्षवेधी नसून, एकतर्फी होणार आहे.’ यावेळी ‘राष्ट्रवादी हटाव—इस्लामपूर बचाव’ अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला
एकतीस वर्षांची सत्ता उलथवून टाका
By admin | Updated: October 27, 2016 23:23 IST