मागणी वाढल्याने हळदीच्या दरात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:26 AM2021-01-20T04:26:16+5:302021-01-20T04:26:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : देशांतर्गत व परदेशातील हळदीच्या मागणीचा आलेख वाढतच असल्याने हळदीच्या दराला तेजीचा उजळपणा लाभत आहे. ...

Turmeric prices rise due to increased demand | मागणी वाढल्याने हळदीच्या दरात तेजी

मागणी वाढल्याने हळदीच्या दरात तेजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : देशांतर्गत व परदेशातील हळदीच्या मागणीचा आलेख वाढतच असल्याने हळदीच्या दराला तेजीचा उजळपणा लाभत आहे. त्यामुळे सध्या सर्व प्रकारच्या हळदीत प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हळद उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

सांगलीच्या बाजारात येत्या महिन्याअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या नव्या हंगामास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी बाजारात जुन्या मालाच्या दरात तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली आहे. सांगलीच्या बाजारात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राजापुरी हळदीला ४ ते ६ हजार ८५० प्रतिक्विंटल दर मिळाला होता. दुसऱ्या आठवड्यात हा दर ४०३३ ते ९ हजार ३६७ रुपये प्रतिक्विंटल झाला. सोमवारी १८ जानेवारी रोजी राजापुरी हळदीला कमाल १० हजार ७०० रुपये दर मिळाला. मराठवाड्यातील बाजारात सर्व प्रकारच्या हळदीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

कोरोना काळात सर्व प्रकारच्या मसाला पदार्थांना मागणी वाढली असताना हळदीने त्यात आघाडी घेतली. हळद ही रोगप्रतिकारक असल्याने त्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे यंदा हळदीची विक्रमी निर्यात झाली. देशांतर्गत खपही वाढला. सध्या शिल्लक मालावर बाजार चालू असल्याने दरात फारशी प्रगती नव्हती. मात्र, नव्या हंगामाच्या तोंडावर आता जुन्या मालाच्या दरातही तेजी आली आहे. दरवर्षी हळदीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन अधिक होत असते. त्यामुळे माल शिल्लक राहतो. त्याचा परिणामही दरावर होत आहे. गेल्या काही वर्षांपासून हळद उत्पादकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दर मिळत नव्हता. कोरोना काळात निर्यातदारांना फायदा झाला, तर देशांतर्गत व्यापार करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

आगामी काळातही हळदीच्या मागणीचा आलेख कायम राहणार असल्याने देशांतर्गत खप व निर्यात वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते पुढील हंगामात निर्यातीत १५ टक्के वाढीचा अंदाज आहे.

चौकट

सध्याचे हळदीचे दर

सध्या राजापुरी हळदीचा दर ६,५०० ते ९,०००, निजामाबाद हळद ६,५०० ते ७,५००, देशी कडपा ५,८०० ते ६,२००, अनपॉलिश्ड मालास ५ ते ५,७०० व नांदेड येथील हळदीला ५,२०० ते ५,७०० प्रतिक्विंटल दर आहे.

Web Title: Turmeric prices rise due to increased demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.