निवास पवार - शिरटे -- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची प्रत्येक निवडणूक दुरंगी व चुरशीची झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते ठरलेलेच असायचे. मात्र यावेळी चित्र पालटले आहे. मोहिते—भोसले आणि मोहिते असा तिहेरी सामना ‘कृष्णा’च्या राजकीय कुरुक्षेत्रावर रंगणार असल्याने मातब्बर नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. कोणत्या नेत्याचा झेंडा हाती घ्यायचा?, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाळवा तालुक्यातील ४२, खानापूर तालुक्यातील तीन, कडेगाव तालुक्यातील २0 व कऱ्हाड तालुक्यातील ६५ गावांचा समावेश आहे. यापूर्वीच्या सर्वच निवडणुकीत दोन्ही गटांनी समावेशक धोरण आखत उमेदवारी दिली होती. गत निवडणुकीत वाळवा तालुक्यातील १0, कडेगाव तालुक्यातील एक हे संस्थापक पॅनेलमधून, तर एक संचालक विरोधी गटातून निवडून आला होता. यामुळे वाळवा तालुक्याची भूमिका निवडणुकीत नेहमीच निर्णायक ठरली आहे.वाळवा तालुक्यात माजी ग्रामविकासमंत्री आमदार जयंत पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेत निवडणुकीतील भूमिका जाहीर केली होती. यावेळच्या निवडणुकीत मात्र पाटील यांचे कार्यकर्ते तिन्ही गटात विभागले जाणार आहेत. त्यामुळे पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.रयत सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ असणारे शिलेदार सत्तांतरानंतर विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पहिल्याच विजयी सभेत ‘आम्हीच तुमचे काम केले’, अशी जोरजोराने भाषणे देत होते. यावेळी या कार्यकर्त्यांची काय भूमिका राहील, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, डॉ. सुरेश भोसले व मदनराव मोहिते—डॉ. इंद्रजित मोहिते अशी तिहेरी लढत यावेळच्या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे कुंपणावर असणाऱ्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. अनेक मातब्बर नेते व कार्यकर्ते, कोणाचा झेंडा घेऊ हाती?, या विचारात आहेत. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे वातावरणही कमालीचे तापू लागले आहे.सर्वांचीच सावध भूमिकाआजवरचा कारखान्याचा इतिहास पाहता, प्रत्येक निवडणूक चुरशीचीच झाली आहे. गतवेळच्या निवडणुकीत पारंपरिक भोसले-मोहिते विरोधक एकत्र आल्याने ‘कृष्णा’च्या राजकारणाचे संघर्षाचे रंग बदलणार असे वाटत असतानाच, संस्थापकांपैकी एक आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी पॅनेल उभे करून अक्षरश: चमत्कार घडवून सत्ता हस्तगत केली. गेल्या निवडणुकीतील अनुभव पाहता, यंदा मोहित्यांचे दोन व भोसले असे तीन गट सर्व ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्तेच नव्हे, तर नेतेमंडळीही अद्याप सावध भूमिकेत दिसत आहेत.
‘कृष्णा’साठी तिहेरी संघर्ष...
By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST