सांगली : जत, कवठेमहांकाळ बाजार समित्या आता सक्षम झाल्या असून, सांगली उत्पन्न बाजार समिती आता वेगळी करुन त्याचे त्रिभाजन करण्यात यावे, अशी मागणी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्य्ाक्ष मनोहर सारडा यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत केली. राज्य शासनाने एलबीटी डिसेंबरअखेर हटवावा, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांचा समावेश आहे. जत आणि कवठेमहांकाळ समित्या आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे मिरज तालुक्यासाठीची बाजार समिती वेगळी करण्यात यावी. सांगली उत्पन्न बाजार समितीमध्ये आता गोळा होणाऱ्या सेसमध्ये सुमारे ८५ टक्के वाटा हा मिरज तालुक्याचा आहे. त्यामुळे हा निधी आमच्या ठिकाणीच खर्च करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. मिरज तालुक्यामध्ये अनेक व्यापारी, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. त्या मिटल्या पाहिजेत. मोठ्या क्षमतेच्या गोदामाची, कोल्ड स्टोअरेजची गरज आहे. हळद ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे हजारो पोती हळद खराब झाली आहे. याकडे आता लक्ष दिले पाहिजे. या सर्व मागण्यांचे निवेदन आम्ही सहकरामंत्री चंद्रकांत पाटील यांना देणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक आल्यापासून अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रस्ते, वीजसह नागरी सुविधा उपलब्ध होत आहे. राजकारणविरहीत विकास कामे झाली आहेत. पुढील कामासाठी निधीची गरज आहे. शेतकरी भवन उभारणी, बगीचा, पार्किंग व्यवस्था, वॉचमनची संख्या वाढवावी याचीही मागणी आम्ही सहकारमंत्र्याकडे करणार आहोत. एलबीटी हा कोणत्याही परिस्थितीत विनापर्याय हटवला पाहिजे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पाळले पाहिजे. करप्रणाली सुटसुटीत हवी. येत्या डिसेंबरअखेर एलबीटी कर हटविला पाहिजे. अन्यथा व्यापारी शिखर परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. (प्रतिनिधी)चार व्यापारी प्रतिनिधी द्याकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दोन व्यापाऱ्यांना संचालक म्हणून प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. व्यापाराची व्याप्ती पाहता ही संख्या चार करण्यात यावी. यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे योग्य पध्दतीने प्रतिनिधीत्व होईल, अशी मागणीही यावेळी सारडा यांनी केली.
कृषी बाजार समितीचे त्रिभाजन करा
By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST