सांगली : तुमच्या मुलाला पोलिसांनी पकडून नेले आहे, असे सांगून त्याला सोडवून आणण्यासाठी पोलिसांचे नाव पुढे करुन सुरेखा बबन शिंदे (वय ३५, रा. इंदिरानगर, सांगली) या महिलेकडे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी ५० हजारांची खंडणी मागितल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. याप्रकरणी मोहितेंसह त्यांची पत्नी ज्योती, आई चिंगुताई कांबळे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेखा शिंदे यांचे नातेवाईक आजारी आहेत. औषधोपचारासाठी ते सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना पाहण्यासाठी त्या शनिवारी सायंकाळी रुग्णालयात गेल्या होत्या. तेथून त्या रुग्णालयासमोरील एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी उत्तम मोहिते, त्यांची पत्नी ज्योती, आई चिंगुताई हे तिघे त्यांच्याजवळ गेले. ‘तुमचा मुलगा नागेशला पोलिसांनी पकडून नेले आहे. त्याला सोडवून आणण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. आमची पोलिसांबरोबर चांगली ओळख आहे. गुन्हा दाखल व्हायचा नसेल, तर पोलिसांना चहापाण्यासाठी पैसे देऊन नागेशला सोडवून आणूया, असे सांगून ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. सुरेखा शिंदे यांनी घरातील लोकांशी चर्चा करुन तुम्हाला कळवितो, असे सांगून तेथून घरी गेल्या. घरातील लोकांच्या मदतीने सुरेखा शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात मुलगा नागेशला पकडून आणले आहे का, याची चौकशी केली. तथापि पोलिसांनी तुमच्या मुलास ताब्यात घेतले नसल्याचे सांगितले. तेवढ्यात मुलगाही घरी आला. त्यानेही मला पोलिसांनी पकडून नेले नसल्याचे सांगितले. उत्तम मोहिते याने खोटे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असल्याचे लक्षात येताच सुरेखा यांनी शहर पोलिस ठाणे गाठले. त्यांच्यासह पत्नी व आईविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयितापैकी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या शोधासाठी छापे टाकण्यात आले, पण कोणाचाही सुगावा लागला नाही. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे हे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)उत्तम मोहिते : पुन्हा अडकलेउत्तम मोहिते यांंनी शनिवारी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे यांनी चोरीच्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन इंदिरानगरमधील भरत देवकुळे या तरुणास मारहाण केल्याचा आरोप केला होता. कामटेंवर कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांना निवेदन दिले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. घरावर हल्लासहा महिन्यांपूर्वी उत्तम मोहिते यांच्या घरावर हल्ला करुन घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. तेव्हापासून मोहिते सातत्याने चर्चेत आहे.
तिघांवर खंडणीचा गुन्हा
By admin | Updated: March 28, 2016 00:27 IST