लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खणभाग येथील मटन मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी झाड कोसळले. त्यामुळे चार ते पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या उद्यान व अग्निशमन विभागाच्या पथकाने झाडाच्या फांद्या तोडून स्वच्छता केली.
तत्कालीन सांगली नगरपालिकेच्या काळात खणभागात मटन मार्केट बांधण्यात आले होते. सध्या या मार्केटची दुरवस्था झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून नवीन मटन मार्केट उभारण्याबाबत केवळ चर्चाच झाली आहे. काही महिन्यांपूर्वी नव्या मटन मार्केटचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण तो अद्यापही लालफितीच आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी मार्केटच्या पाठीमागील झाडाची फांदी तुटली. ही फांदी चार ते पाच दुकानांवर कोसळली. दुकानांच्या पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. मार्केटमध्ये फारशी वर्दळ नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. दुकानदारांनी स्वच्छता निरीक्षकांकडे झाडांच्या फांदी तुटण्याबाबत तक्रार केली होती. पण निरीक्षकांनी दुर्लक्ष केल्याने चार ते पाच दुकानदारांचे नुकसान झाले. महापालिकेने तात्काळ या दुकानांची दुरुस्ती करून संबंधित स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.