पलूस : कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन केला. मागील लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला सरसकट सर्व दुकाने बंद ठेवून कडक बंद पाळून व्यापारी व व्यावसायिकांनी सहकार्य केले, पण आता अटी व नियम घालून व्यवसाय सुरू ठेवण्याची मागणी व्यावसायिकांतून होत आहे.
सध्या अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांना सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत मुभा आहे. पण इतर व्यावसायिकांना बंदी आहे. त्यांनाही दुकान भाडे, वीज बिल, इतर कर, बँकांचे हप्ते भरावे लागतात. अशा परिस्थितीत शासनाने काहीतरी मार्ग काढून या व्यवसायांना तारण्यासाठी किमान दिवसातील काहीवेळ दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी करत आहेत.
असे झाले नाही, तर हे व्यवसाय भविष्यात संपुष्टात येतील. याबाबत व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदने दिली, परंतु काहीही मार्ग निघाला नसल्याने नाराजी दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आदेश आहेत; पण त्यांना मागणी असूनही लस उपलब्ध होत नाही.
कोट
सध्यातरी लॉकडाऊनचे नियम सर्वांवर बंधनकारक आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यावर नियमातील शिथिलतेबाबत विचार केला जाईल. सर्वांनी नियमांचे पालन करून रुग्णसंख्या कमी करण्याला सहकार्य करावे.
-डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी