कोकरूड : सध्या शिराळा तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानला अनेक पर्यटक भेट देत आहेत. कास पठाराप्रमाणे झोळंबी परिसरात फुलणाऱ्या विविध फुलांचे मनोहारी दृश्य पहायला मिळेल म्हणून भटकंती करत आहेत. मात्र त्यांची घोर निराशा होत आहे. निसर्गाच्या अवकृपेने यंदा विविध फुले फुललेली नाहीत. निसर्ग हा एक जादूगार आहे. याची प्रचिती चांदोली राष्ट्रीय उद्यान पाहिल्यावर आल्यावाचून रहात नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, हिरवीगार वनराई, भर उन्हात गारवा देणारा वसंतसागर जलाशय यामुळे अनेक पर्यटक चांदोलीला दररोज भेट देऊन निसर्गाने केलेल्या मुक्त उधळणीचा आनंद घेतात.दर पावसाळ्यात हे उद्यान ४ महिने पर्यटकांसाठी बंद असते. याच कालावधित म्हणजे सप्टेंबर ते आॅक्टोबरमध्ये उद्यानातील झोळंबी परिसरात कास पठराप्रमाणे स्मिथीया, सदाफुली, सोनकी, मंजिरी, नीलिमा, अबोलीमा, सिटीचे अश्रू, धनगरी फेटा अशा अनेक जातींची फुले फुलतात. हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं इतकं विलोभनीय असतं.मात्र उद्यान बंद असल्यामुळे या सौंदर्याला पाहण्यापासून पर्यटक वंचित राहतो. केवळ १५ ते ३० दिवसच या फुलांचा हंगाम असतो. उद्यान ४ महिन्यांनी सुरू झाल्यानंतरही दृश्य पहायला मिळत नाही. पर्यटकांना या सौंदर्याचा आनंद घेता यावा म्हणून या वर्षापासून वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पावसाळ्यातही उद्यान पर्यटकांसाठी खुले ठेवले. अनेक पर्यटक हा सडा पाहण्याच्या उद्देशाने चांदोलीत आले; मात्र त्यांची यंदा घोर निराशा झाली. आता सड्यावरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना पुढच्या वर्षाची वाट पहावी लागणार आहे. (वार्ताहर)
‘झोळंबी’तील सौंदर्यापासून पर्यटक वंचित
By admin | Updated: December 1, 2014 00:04 IST