सांगली : महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर पोलीस यंत्रणेचीही लगबग सुरु झाली. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळ, डॉल्बीधारक यांची आज (शनिवार) सायंकाळी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी यंदाची ‘नो डॉल्बी’चा इशारा दिला आहे. गायकवाड म्हणाले की, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक भावना भडकावणारे देखावे करू नयेत. समाजप्रबोधन देखाव्यावर भर द्यावा. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करावी.स्वतंत्रपणे वीज कनेक्शन घ्यावे. मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी. रात्रीच्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीजवळ थांबावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची विशेष काळजी घ्यावी. गणेश आगमन व विसर्जनादिवशी वेळेचे बंधन पाळावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणालाही डॉल्बीचा वापर करता येणार नाही. कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावण्याचा प्रयत्न करु नये. डॉल्बीधारकांनीही डॉल्बी भाड्याने देऊ नये. तसे आढळून आल्यास डॉल्बी जप्त करुन संबंधितावर गुन्हे दाखल केले जातील.या बैठकीस किरण वाघमोडे, अमोल घोडके, नंदू माळी, जॉनसन मद्रासी, पृथ्वीराज पाटील, रावसाहेब चव्हाण, शीतल पाटील, विनोद कुंभार, अमोल ऐनापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
यंदाही ‘नो डॉल्बी’च!
By admin | Updated: July 27, 2014 00:31 IST