जयवंत आदाटे - जत-सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी वसंतदादा रयत पॅनेलच्या नेत्यांनी जत तालुक्यासाठी प्रथमच सात जणांना उमेदवारी देऊन झुकते माप दिले आहे. तसेच शेतकरी विकास पॅनेलच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे सहा नवख्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे पॅनेल प्रमुखांनी येथे जादा लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाठोपाठ आता बाजार समिती निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. वसंतदादा आणि शेतकरी पॅनेलच्या नेत्यांनी तालुक्यातील जत, शेगाव व उमदी या तीन जिल्हा परिषद मतदार संघातील एकही उमेदवार दिला नाही. बनाळी जिल्हा परिषद मतदार संघातील दोन्ही पॅनेलमध्ये प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी विकास पॅनेलकडे दिग्गजांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले होते. परंतु या सर्वांना बाजूला ठेवून नवीन चेहरे उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालानंतर आमदार विलासराव जगताप यांनी सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीला भाजपसोबत घेऊन त्यांना दोन जागा त्यांनी दिल्या आहेत. परंतु उमेदवारी डावलण्यात आलेल्या भाजपातील नाराज कार्यकर्त्यांची नाराजी त्यांना दूर करावी लागणार आहे. हे करीत असताना त्यांची तालुक्यात दमछाक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे प्रचाराची जबाबदारी स्वीकारणार आहेत. सोसायटी गट - रामचंद्र माने (येळवी), बसगोंडा जाबगोंड (बिळूर), ग्रामपंचायत गट - प्रमोद सावंत (अचकनहळ्ळी), आर्थिक दुर्बल गट - सदाशिव माळी (माडग्याळ), ओबीसी गट - सिद्धनगौडा पाटील (बोर्गी खु.), महिला - शारदा पाटील (पाच्छापूर) हे त्यांचे उमेदवार आहेत.वसंतदादा पॅनेलने प्रथमच सर्वाधिक सात जणांना उमेदवारी देऊन इच्छुक कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय समतोल राखण्यासाठी ऐनवेळी जत नगरपालिका नगरसेवक सुजय शिंदे यांची उमेदवारी कमी करुन रवींद्र सावंत यांचे नाव कायम केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाची मदत झाली होती. आता बाजार समिती निवडणुकीत त्यांनी जनसुराज्य पक्षासोबत युती करुन त्यांना एक जागा दिली आहे. जत तालुका राष्ट्रवादीने महादेव पाटील व सिद्धू सिरसाड या दोघांना उमेदवारी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत नसली तरी, त्यांचे मतदार आमच्यासोबत आहेत, असा दावा जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत व बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. प्रचारात जाहीरपणे सहभाग न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या येथील काही नेत्यांनी घेतला आहे. याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. खरी लढत काँग्रेस-भाजपमध्येचबाजार समिती निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेस-जनसुराज्य युती असली तरी, खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.सोसायटी गट- दयगोंडा पाटील ऊर्फ बिरादार (संख), मच्छिंद्र वाघमोडे (रेवनाळ), रवींद्र सावंत (बनाळी), ग्रामपंचायत गट - रामगोंडा संती (खोजानवाडी), आर्थिक दुर्बल गट - अभिजित चव्हाण (डफळापूर), ओबीसी - संतोष पाटील (सोन्याळ), महिला - सुगलाबाई बिराजदार (मुचंडी) असे वसंतदादा रयत पॅनेलचे जत तालुक्यातील उमेदवार आहेत.
दोन्ही पॅनेलकडून जतला झुकते माप
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST