लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावर नेर्ले ते पेठ नाका दरम्यान चालक आणि क्लीनरला लोखंडी गजाने जबर मारहाण करत वाळूचा चौदा चाकी ट्रक पळवणाऱ्या टोळीतील तिघा जणांना इस्लामपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने अटक केली. या टोळीकडून ट्रक आणि इतर दोन वाहने असा ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. टोळीतील पाच जण पसार झाले आहेत.
अतुल शहाजी इथापे (वय २८, रा. वाढेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर), चंद्रकांत सुभाष जाधव (३५, रा. जुना बुधगाव रोड, कुपवाड), प्रवीण मधुकर इथापे (२५, रा. देवनाळ, ता. जत) अशी अटक केलेल्या तिघा चोरट्यांची नावे आहेत. येथील न्यायालयाने तिघांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण शाखेने ट्रक (क्र. केए २३ बी १५१५), छोटा हत्ती (एमएच १० सीक्यू ७८९३) आणि मोटार अशी तीन वाहने हस्तगत केली आहेत.
या चोरट्यांच्या टोळीने मुडशिंगी (ता. करवीर) येथील अर्जुन धर्माण्णा बिरादार यांच्या मालकीच्या ट्रकची चोरी करताना बसवराज आनंदराव पाटील (३२, रा. जाडरबोबलाद) आणि चालक हणमंतराय संगाप्पा माडग्याळ (३६, रा. जाडरबोबलाद) अशा दोघांना लोखंडी गजाने मारून जखमी केले होते. ही घटना १० मार्चच्या रात्री बाराच्या सुमारास घडली होती. त्यानंतर टोळक्याने जखमी चालक व क्लीनरला वाहनाच्या पाठीमागे टाकून त्यांना तुुंग फाट्यावर सोडून देत ट्रकसह पलायन केले होते.
याबाबत बसवराज पाटील याने फिर्याद दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत या टोळीचा छडा लावत तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत प्रवीण साळुंखे, दीपक ठोंबरे, प्रवीण पाटील, अमोल चव्हाण, शरद जाधव, गणेश शेळके, आलमगिर लतीफ, सूरज जगदाळे, अमोल सावंत, उमाजी राजगे यांनी भाग घेतला.