मिरज : म्हैसाळ योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील तीन पंप मंगळवारी रात्री सुरू झाले. आज सायंकाळपर्यंत तिसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचले. मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जतपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने पाणी मागणी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन ‘म्हैसाळ’चे कार्यकारी अभियंता महादेव धुळे यांनी केले आहे. गेली चार वर्षे राज्य सरकारने टंचाई निधीतून वीज बिल भरल्याने म्हैसाळ योजना सुरू राहिली होती. गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. १ कोटी ६४ लाखांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध झाल्यानंतर महावितरणने वीज पुरवठा सुरू केला. शेतकऱ्यांसाठीच असलेली ही योजना वीज बिले भरली तरच सुरू राहील, असे धुळे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची मागणी अर्ज येतील त्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची भूमिका आहे. चोरून पाणी घेणाऱ्यांवर पंचनामे करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवण्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज अपेक्षित आहेत. मात्र अद्याप मागणी अर्ज कमी असल्याने पाणी मागणी अर्ज गोळा करण्यासाठी आधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. योजना सुरू झाल्यानंतर लगेचच पाणी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचले असून, चौथ्या टप्प्यात पाणी पोहोचल्यानंतर डोंगरवाडी योजनेच्या उद्घाटनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)पाणी मागणी अर्ज द्याखासदार संजय पाटील यांनी बुधवारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या परिसरास भेट दिली. म्हैसाळचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे व अन्य अधिकाऱ्यांसोबत योजनेची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून योजनेतील तांत्रिक अडचणी, पाणी गळती आदींची माहिती घेऊन सूचना दिल्या. यावेळी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवण्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज मिळणे अपेक्षित आहेत. मात्र अद्याप वारंवार आवाहन करूनही मागणी अर्ज कमी आहेत. यापुढे शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरली तरच योजनेचे वीजबील भरणे शक्य आहे, अन्यथा योजना पुन्हा बंद होईल, असे धुळे यांनी सांगितले. खासदार पाटील यांनी शनिवारी पुन्हा म्हैसाळ योजनेचा दौरा करून शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज देण्याबाबत आवाहन करणार असल्याचे सांगितले.
म्हैसाळ योजनेच्या तीन पंप सुरू
By admin | Updated: April 9, 2015 00:02 IST