सांगली : येथील तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक घन:शाम बळप व पोलीस कॉन्स्टेबल आकीब काझी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेशाला आज (शुक्रवार) न्यायालयाने स्थागिती दिली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. जी. धमाळ यांनी हा निर्णय दिला. याप्रकरणी फिर्यादी नालसाब मुल्ला व सरकारी वकिलांनी ५ नोव्हेंबरला म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला.सावकारीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन दीड लाखांची खंडणीची मागणी करुन एक लाख रुपये घेतले. तसेच मुश्ताक मुल्ला या माझ्या भावास पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते. यामुळे नेरकर, बळप व काझी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद नालसाब मुल्ला यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यावर गेल्या आठवड्यात मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एम. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते.या निकालाविरुद्ध पोलिसांतर्फे जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले होते. नेरकर, बळप व काझी यांच्यातर्फे अॅड. प्रमोद सुतार यांनी युक्तीवाद करताना, शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करताना वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. यातील फिर्यादी मुल्ला यांनी दहा महिन्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे. त्यांनी लाचलुचपत विभागात का तक्रार केली नाही. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती. मात्र कोणतेही पुरावे दिले नव्हते, असे सांगितले. (प्रतिनिधी)
नेरकरसह तिघांवर गुन्हा; आदेशाला स्थगिती
By admin | Updated: September 20, 2014 00:26 IST