इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथे गुरुवारी रात्री बारा-तेरा जणांच्या जमावाने संगनमत करत लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला चढवत एकाच कुटुंबातील तिघांना जखमी केल्याची घटना घडली. महाप्रसादाच्या जेवणावळीत शिवीगाळ करून पुन्हा हा हल्ला झाला. या घटनेने पेठ गावात गणपती मंडळातील इर्षेचा वाद उफाळून आल्याची चर्चा होती.सूरज विठ्ठल पाटील (२५) याच्यासह वडील विठ्ठल सुबराव पाटील आणि चुलत भाऊ पवन पांडुरंग पाटील अशी तिघा जखमींची नावे आहेत. याबाबत सूरज याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिमन्यू कदम, ऋतुराज कदम, अनिकेत हणमंत कदम, सुशांत कदम, आदित्य कदम, अतुल कदम, प्रथमेश कदम, शुभम कदम, सागर पवार,सौ रभ चव्हाण आणि दोन-तीन अनोळखी अशा सर्वांविरुद्ध गर्दी मारामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सूरज हा वडिलांसोबत नवज्योत गणेश मंडळाच्या महाप्रसादाचे जेवण करण्यासाठी गेले होते.तेथे सुशांत कदम याने विठ्ठल पाटील यांना शिवीगाळ केली.यावेळी हा वाद मिटवून ते मधल्या वाड्यातील शिवशक्ती तरुण मंडळाच्या गणपतीजवळ येऊन थांबले होते.
त्यावेळी वरील सर्व हल्लेखोरांनी बेकायदा जमाव जमवून लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला करत सूरजसह त्याचे वडील आणि चुलत भावाला जबर मारहाण करून जखमी केले.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.