सांगली : महापालिका क्षेत्रात ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी १०१९ जणांनी लस घेतली. आतापर्यंत २३ हजार जणांचे लसीकरण झाले आहे.
याबाबत आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महापालिका क्षेत्रात दोन शासकीय रुग्णालये, महापालिकेची १४ आरोग्य केंद्रे आणि १३ खासगी दवाखाने अशा एकूण २९ ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. यात ३१ मार्चअखेर १८,५५२ ज्येष्ठ नागरिक तर ३,६७७ व्याधीग्रस्त नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. गुरुवारपासून ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून, यामध्ये पहिल्या दिवशी १,०१९ तर ५५८ ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण केले जाणार असून, या वयोगटातील सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.