मिरज : बनावट मुद्रांकांच्या संशयाने नोंदणी महानिरीक्षकांनी राज्यात एक हजार व त्यापुढील मुद्रांकांची छपाई, वितरण व विक्रीवर प्रतिबंधाचा आदेश दिला आहे. यामुळे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सर्वांना ई-चलनाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे रोजगार बुडणार असल्याने मंगळवारी मुद्रांक विक्रेत्यांनी हजारावरील मुद्रांक विक्री बंद आदेशास विरोध केला आहे. मालमत्ता खरेदी व विक्री तसेच इतर कारणांसाठी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी एक हजार, पाच हजार, दहा हजार, पंधरा हजार व वीस हजार किमतीचे मुद्रांक उपलब्ध होते. बनावट मुद्रांकांना आळा घालण्यासाठी मुद्रांकावर क्रमांक, वापराचे कारण यासह सर्व माहिती नोंदविण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही काही मोठ्या शहरात बनावट मुद्रांक सापडल्याची घटना घडल्याने राज्याच्या मुद्रांक नियंत्रकांनी एका महिन्यापूर्वी सर्व मुद्रांक विक्रेत्यांकडील मुद्रांक तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. तपासणीनंतर पुन्हा मुद्रांक विक्री सुरू करण्यात आली, मात्र एक हजार व त्यावरील किमतीच्या सर्व मुद्रांकांची छपाई, विक्री व वितरणावर प्रतिबंधाचा आदेश राज्यातील सर्व जिल्हा कोषागारांना दिला आहे. पुढील आदेशापर्यंत मुद्रांक विक्री बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सर्व ठिकाणी पाचशेच्या वर किंमत असलेल्या मुद्रांकांची विक्री थांबवून त्यांचा वापर बंद करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क भरण्यासाठी फ्रँकिंग ही व्यवस्था यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजारापेक्षा जास्त मुद्रांक शुल्क भरण्यासाठी व जास्त किमतीच्या सर्व व्यवहारांसाठी ई-चलनाचा वापर करून मुद्रांक शुल्काची रक्कम नोंदणी विभागाच्या बँक खात्यावर भरावी लागणार आहे. मोठ्या किमतीचे मुद्रांक नसल्याने कमी किमतीच्या मुद्रांकांची पाने वाढल्यामुळे नोंदणीसाठी जादा शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांना शंभर ते पाचशेचे मुद्रांक विक्रीसाठी मिळणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष मदन तांबडे यांनी सहदुय्यम निबंधक एन. एस. जाधव यांना निवेदन दिले. (वार्ताहर)आंदोलनाचा इशाराबनावट मुद्रांकांच्या संशयाने मुद्रांक विक्री बंद करण्याच्या निर्णयामुळे मुद्रांक विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याने मुद्रांक विक्री संघटनेने याला विरोध दर्शविला आहे. मुद्रांक विक्रीवरील प्रतिबंध न हटविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुद्रांक विक्री बंदीचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
हजारांवरील मुद्रांकांची विक्री बंद
By admin | Updated: February 3, 2015 23:58 IST