लोकमत न्यूज नेटवर्क
जत : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. आजही विविध ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रांमध्ये कोविड लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र, ही लस घेण्यासाठी शेतकरी, शेतमजूर व हमाल लोकांचे अल्प प्रमाण दिसून येत आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने कोविड लसीकरणाची मात्रा देणे सुरू केले आहे. मात्र, या कोविड लसीकरणापासून जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मजूर, हमाली करणारे, आठवडी बाजार करणारे व्यावसायिक बांधव अज्ञान, भीती व चुकीच्या माहितीमुळे खूप दूर गेला आहे. आजही येथील ६० टक्के मजूर बांधवांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोसही घेतलेला नसल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनापासून साखळी सुटका मिळावी म्हणून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसीकरणाच्या मात्रा देणे सुरू आहे. प्रत्येक आठवड्यातील विविधदिवशी नियोजनबद्ध सांगली जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर विविध गटातील (१८ ते ६० वर्षांवरील) नागरिकांना लसीकरणाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही मजूर लोक अज्ञान, भीती व अंधश्रद्धांमुळे कोविड लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.