दिलीप मोहिते - विटा -- सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढत्या विटा शहरात पडीक व रिकाम्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या पडीक प्लॉटमध्ये वाढलेली झुडपे, गवत व घाणीचे साम्राज्य पसरल्याने रहिवास क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विटा पालिका प्रशासनाने शहरातील पडीक प्लॉटचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला असून, हे पडीक व अस्वच्छ रिकामे प्लॉटधारक आता पालिकेच्या रडारवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्लॉटधारकांना नोटिसा काढून प्लॉटची स्वच्छता करण्याचा सल्ला देण्यात येणार असून, पालिकेच्या या उपक्रमाला प्रतिसाद न मिळाल्यास प्रसंगी प्लॉटधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत.विटा शहरात रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटचे दर गगनाला भिडले आहेत. सोने-चांदी गलाई व्यवसाय असलेले अनेक गलाई बांधव व स्थानिकांनी रिकामे प्लॉट खरेदी करून गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. रिकामे प्लॉट खरेदी करून दर वाढल्यानंतर त्याची विक्री करण्यात येते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विट्यातील प्लॉट रिकामे पडून आहेत. परिणामी, अशा प्लॉटमध्ये झुडपे, गवत वाढले असून, शेजारच्या रहिवाशांनी सांडपाणी रिकाम्या प्लॉटमध्ये सोडून कचराही मोठ्या प्रमाणात टाकला आहे. या घाणीमुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहेच, शिवाय डासांची उत्पत्ती वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर विटा शहरातील रिकामे व गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या पडीक प्लॉटचा सर्व्हे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील हणमंतनगर, गावठाण, घुमटमाळ, साळशिंगे रस्ता, यशवंतनगर, मायणी रस्ता, लेंगरे रस्ता, शाहूनगर, संभाजीनगर, भवानी माळ, पाटील वस्ती, नेवरी नाका, भैरवनाथनगर यासह अन्य उपनगरांत मोठ्या प्रमाणात रिकामे व स्वच्छ प्लॉट आहेत. त्यामुळे या भागातील जे प्लॉट अस्वच्छ असतील, त्या प्लॉटधारकांना नोटिसा देऊन प्लॉटची स्वच्छता करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. त्यातून कोणी प्लॉटची स्वच्छता न केल्यास संबंधित प्लॉटधारकांवर महाराष्ट्र नगरपंचायत व नगरपरिषदा अधिनियमाखाली कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी पालिका कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्याचा निर्णय घेतला असून, हे पथक लवकरच सर्व्हे करून मुख्याधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे प्लॉटधारकांना आता आपापल्या प्लॉटची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.
विट्यामध्ये अस्वच्छ प्लॉटचे सर्वेक्षण होणार
By admin | Updated: March 1, 2015 23:16 IST