आटपाडी : आटपाडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.
आटपाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमदार अनिल बाबर यांच्या स्थानिक विकास निधीतून ४२ लाखांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाबर बाेलत हाेते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे नेते तानाजी पाटील, सरपंच वृषाली पाटील, माजी सरपंच शिवाजी पाटील, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. धनंजय पाटील, दत्तात्रय पाटील, आटपाडी तालुका शिवसेना अध्यक्ष साहेबराव पाटील, आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डी. एम. पाटील, राजेंद्र खरात, संतोष पुजारी उपस्थित हाेते.
बाबर म्हणाले की, आटपाडीतील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील यांनी निधी मिळविण्यामध्ये आघाडीवर आहेत. तानाजी पाटील म्हणाले की, आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामांची मागणी करण्यास हयगय करू नये. विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल बाबर कटिबद्ध आहेत.
यावेळी आटपाडीतील जोतिर्लिंग मंदिर सभामंडप : ७ लाख, चौंडेश्वरी मंदिर सभामंडप : १० लाख, कल्लेश्वर मंदिर सभामंडप : १० लाख, हनुमान मंदिर सभामंडप : १२ लाख, ढोरगल्ली सभागृह ७ लाख, पांढरेवाडी ते सोनारसिद्ध रस्ता : ३ लाख रुपये, अशा विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य उषा चव्हाण-पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे, बाळासाहेब मेटकरी, सुबराव पाटील, अरविंद चव्हाण, माजी प्राचार्य बी. ए. पाटील, अभिजीत देशमुख, पिनू माळी, विजय देवकर, मनोज नांगरे-पाटील, संतोष पाटील, दौलतराव चव्हाण-पाटील, सुहास देशमुख आदी उपस्थित होते.