विटा : शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बस्तवडे (ता. तासगाव) येथे तत्वतः मान्यता दिली असताना आमदार अनिल बाबर यांनी उडवाउडवीची आणि सोयीस्कर उत्तरे देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आमदार बाबर यांची खानापूर येथे उपकेंद्र होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का? हे उपकेंद्र खानापूरला व्हावे असे त्यांच्या मनात तरी आहे का? असा प्रश्न विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पाटील यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत विचारला.
वैभव पाटील म्हणाले, उपकेंद्र खानापूरला होण्यासाठी आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य धैर्यशील पाटील यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ उपकेंद्र बस्तवडे येथे होण्यासाठी शासनाचा अधिकृत निर्णय झाला असल्याचे सांगितले. मात्र, जबाबदार लोकप्रतिनिधी असलेले आमदार बाबर याबाबत बाेलण्यास तयार नाहीत. शिक्षणमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेल्या बाबर यांना या निर्णयाची कशी माहिती दिली नाही. सरकारमध्ये आपले वजन असेल तर ते वापरून आमदारांनी खानापूर उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा खानापूरला उपकेंद्र व्हावे असे त्यांच्याच मनात नसणार, अशी जनभावना तयार होईल. तोपर्यंत किमान सोमवारी बस्तवडे येथे जागा पाहणीसाठी येणारी कमिटी थांबवावी, अशी मागणी यावेळी वैभव पाटील यांनी केली.
चौकट :-
खानापुरात आज चक्काजाम...
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र बस्तवडे येथे करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी जागा पाहणीसाठी बस्तवडेत कमिटी येणार आहे. या कमिटीचा निषेध म्हणून आणि खानापूर येथे उपकेंद्र व्हावे, या मागणीसाठी सोमवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता खानापूर येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे खानापूर तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले.
फोटो :- वैभव पाटील यांचा वापरणे.