कुपवाड : भारत देशाला सध्या अनिवासी पंतप्रधान सापडले आहेत. ते देशात नसतातच, ही देशवासीयांसमोरील मोठी समस्या बनली आहे. काल-परवा इंग्लंडला गेले होते. त्यानंतर लगेच सिंगापूर, मलेशियाला गेले. त्यांच्या विदेश दौऱ्याबाबत सध्या सोशल मीडियावरून खरमरीत टीका होऊ लागली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केले. कुपवाडमधील विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी मल्हारराव होळकर चौकामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, स्रेहा औंधकर, शेडजी मोहिते, माजी महापौर मैनुद्दीन बागवान प्रमुख उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्या महागाईने जनता त्रस्त बनली आहे. तूरडाळीची किंमत दोनशेच्या घरात पोहोचली आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला तोशीष बसू लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शासनाच्या कालावधित डाळीचे दर नियंत्रणात होते. स्वस्त धान्य दुकानातूनही आम्ही धान्य देत होतो. सध्या मात्र देशात नियोजनाचा अभाव आहे. कांदा आणि डाळीबाबत झाले ते पुढे साखरेबाबतही होणार आहे. जगात महागाईचा निर्देशांक कमी असताना देशातील महागाईचाही निर्देशांक कमी होणे गरजेचे आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारपेठेत कमी झाल्यानंतर भारतात मात्र त्यावर कर बसवून हजारो कोटी कमवून तिजोरी भरली. पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असताना भारतीय समुदायासमोर देशाचे गुणगाण गाण्याऐवजी देशातील कमजोरी दाखवू लागले आहेत. आपल्या देशातील कमजोरी बाहेरील देशात जाऊन सांगणे त्यांच्याकडून अभिप्रेत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, हरिदास पाटील, संजय औंधकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेविका आशा शिंदे, विलास सर्जे, मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब लवटे, किरण सूर्यवंशी, प्रकाश व्हनकडे, ताजुद्दीन तांबोळी, मनगू सरगर, मारुती पाटील, बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
देशात अनिवासी पंतप्रधानांची मोठी समस्या
By admin | Updated: November 22, 2015 00:04 IST