सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव संमत करून राष्ट्रवादीने केलेल्या राजकारणामुळे जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत वातावरण तापले आहे. हा खेळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने उद्या (गुरुवारी) मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत याविषयीचे गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादीशी संगत करू नये, असा आग्रह दोन्ही जिल्हाध्यक्षांनी धरला आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांना विधानपरिषद सभापती पदावरुन हटविण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपशी संगनमत केल्याने, जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या प्रामाणिकपणाबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला होता. काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात छुप्या खेळी राष्ट्रवादीकडून होत असल्याच्या तक्रारीही झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याविषयी चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादीने देशमुखांविरोधात राजकारण केल्याने वातावरण बिघडले आहे. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून देताना, यापुढे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर मैत्रीचा हात पुढे करू नये, अशी मागणी केली आहे. मुंबईत उद्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत देशमुखांविषयी झालेल्या राजकारणावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजीही व्यक्त केली जाणार आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले की, आम्ही एका बाजूला मैत्रीचा हात पुढे करीत असताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असा विश्वासघात करणे चुकीचे आहे. शिवाजीराव देशमुख हे ज्येष्ठ नेते असताना, विनाकारण त्यांना पदावरून हटविण्यासाठी केलेली राष्ट्रवादी व भाजपची ही खेळी अत्यंत चुकीची आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या कुरघोड्या नव्या नाहीत. वारंवार आम्ही राष्ट्रवादीशी मैत्री नको म्हणून नेत्यांकडे मागणी करीत आहोत. शिवाजीराव देशमुख यांना पदावरून हटविण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना का हटविले, याचा खुलासा करावा. यापुढे कोणत्याही निवडणुकीत पक्षाने राष्ट्रवादीशी मैत्री करू नये. राष्ट्रवादीवर यापुढे विश्वास ठेवू नये.- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पोटनिवडणुकीतले धोरणराष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रथम कॉँग्रेसनेच पुढाकार घेतला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्याबाबतचा निर्णयही कॉँग्रेसने प्रथम घेतला. त्याचवेळी विधानपरिषदेच्या सभापतिपदावरून कॉँग्रेसचे नेते शिवाजीराव देशमुखांना हटविण्यासाठी राष्ट्रवादीने खेळी केली. दोन्ही पक्षांच्या या भूमिकेची तुलना आता जिल्ह्यात रंगली आहे. पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही या गोष्टीचा उल्लेख करीत राष्ट्रवादीकडे खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली.
राष्ट्रवादीबद्दल कॉँग्रेस नेत्यांमध्ये संताप
By admin | Updated: March 18, 2015 23:55 IST