कसबे डिग्रज : शेतकरी आणि संपूर्र्ण ग्रामीण भागाची गळचेपी करणारा भूमी अधिग्रहण कायदा आणि कच्ची साखर निर्यात धोरण तसेच सहकारी संस्थांबाबतचे धोरण याबाबत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. पण शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे खा. राजू शेट्टी सत्तेला चिकटून आहेत. त्यांना खरोखरच स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान जयंत पाटील यांनी शेट्टी यांना दिले. समडोळी, मौजे डिग्रज येथील आभार दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदारकी, मंत्रिपदाची आशा यामुळे राजू शेट्टींची अवस्था दयनीय आहे. शेट्टींनी स्वाभिमान गहाण टाकला आहे. शेतकऱ्यांना भांडवलधार्जिण्या सरकारच्या दावणीला बांधले आहे. हिम्मत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही. मी कधीही ग्रामपंचायत, सोसायटीच्या स्थानिक निवडणुकांत लक्ष घालत नाही. त्यामुळे सोसायटी निवडणुकांच्या निकालामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले. मौजे डिग्रज आणि समडोळी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या नवीन काम सुरू झालेल्या पुलाची पाहणीही करण्यात आली. यावेळी उद्योजक भालचंद्र पाटील, भाऊसाहेब मगदूम, अजयसिंह चव्हाण, हरिदास पाटील, वैभव पाटील, प्रमोद आवटी, सुरगौंडा पाटील, भास्कर पाटील, रवी माणगावे, संजय हजारे उपस्थित होते. (वार्ताहर)सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत..गतवेळेच्या शासनाने आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कच्ची साखर निर्यात लवकर सुुरू केली होती. त्यामुळे बाजारात साखरेचे भाव स्थिर होते; पण सध्या साखरेचे भाव २३०० पर्यंत खाली येत आहेत. त्यामुळे ऊसदर कोसळत आहे. २५०० दर देणारे कारखाने अडचणीत येत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
...तर राजू शेट्टींनी सरकारमधून बाहेर पडावे
By admin | Updated: March 18, 2015 00:04 IST