शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

विशेष लेख: दादा-बापू यांचा वाद म्हणजे इतिहासाचे सोनेरी पान..!

By वसंत भोसले | Updated: April 19, 2024 15:58 IST

संघर्ष जरी झाला असला तरी तो एकमेकांच्यावर कुरघोडी करण्यासाठी निश्चितच नव्हता

डॉ. वसंत भोसले, संपादक लोकमत कोल्हापूर                                                                पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या वादाचा विषय काढण्याची गरज नाही. मात्र त्याला एक ऐतिहासिक बाजू आहे. १९६७ मध्ये सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी वारणा नदी.  तिच्यावर धरण बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ते धरण कोठे व्हावे आणि किती पाणी साठवण क्षमतेचे असावे. यावरून वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. यासाठी त्यांनी आपापली बाजू जोरदारपणे मांडली होती. सुमारे पाच वर्षे हा वाद गाजत होता. त्यासाठी मोर्चे निघत होते. मेळावे होत होते. जाहीर सभा होत होत्या. पदयात्रा निघत होत्या. सांगलीबरोबरच वारणा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील कोल्हापूर जिल्ह्यातून देखील या वादाला फोडणी घातली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नेते राजारामबापू पाटील यांच्या बाजूने उभे होते. वारणा नदीच्या खोऱ्यातील खुजगाव या गावाच्या हद्दीमध्ये हे धरण व्हावे आणि तेथे धरण झाल्यास पाणलोट क्षेत्र मोठे मिळेल. त्यामुळे ८४ टीएमसी पाणीसाठा होईल. अशी बाजू राजारामबापू पाटील मांडत होते. मात्र खुजगाव ते चांदोली पर्यंतच्या परिसरामध्ये सोनवडे चरण आरळा मणदुर अशी अनेक स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेली गावे होती. ती सर्व पाण्याखाली जाणार होती. त्या काळात पुनर्वसनाचा  कायदा अजून अस्तित्वात आलेला नव्हता. शेजारच्या सातारा जिल्ह्यामध्ये शंभर टीएमसी साठवण क्षमतेचे कोयना धरण बांधण्यात आले होते.त्या धरणाच्या बांधकामामुळे धरणग्रस्त झालेल्या लोकांचे पुनर्वसन पूर्ण झाले नव्हते. ते आजही सतर वर्षानंतर अपूर्णच आहे. त्यामुळे वारणा खोऱ्यातील बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या गावातील स्वातंत्र्य सैनिकांचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा खुजगाव येथे वारणा धरण बांधण्यासाठी बांधण्यास विरोध होता. ' आमची गावे उद्ध्वस्त करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवलेले आहे का?' असा सवाल त्या भागातील अनेक स्वातंत्रसेनानी करीत होते.                                             क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याच्या प्रति सरकारची उभारणी याच गावाच्या परिसरातील जंगलामध्ये झाली होती. शेकडो तरुण शस्त्रास्त्रे घेऊन या जंगलात प्रशिक्षण घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र संघर्ष  करण्यासाठी तयारी करीत होते. २५ फेब्रुवारी १९४५ रोजी ब्रिटिश पोलिसांनी या तरुणांच्या प्रशिक्षण केंद्राला वेढा टाकला. रात्री झालेल्या चकमकीमध्ये किसन अहिर आणि नानकसिंग शहीद झाले होते. सोनवडे गावच्या परिसरात हा रक्तरंजित संघर्ष त्यावेळेला झाला होता. खुजगाव येथे धरण झाल्यास हा सर्व परिसर पाण्याखाली जाणार होता आणि लोक उघड्यावर पडणार होते. पुनर्वसन होणार नाही. शेती नष्ट होणार, गावे नष्ट होणार, घरे नष्ट होणार असे लोकांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी विरोध केला स्वातंत्रसेनानी असलेल्या वसंतदादा पाटील यांनी त्यांची बाजू घेतली आणि राजारामबापू पाटील मात्र खुजगाव येथे धरण बांधावे, यासाठी आग्रही राहिले.           हा तो वाद होता आणि त्या वादातूनच त्यांनी आपले राजकीय मार्ग वेगळे निवडले. राजारामबापू पाटील यांना निवडणुकीत यश मिळू नये, याच्यासाठी वसंतदादा पाटील यांनी प्रयत्न केले. पुढे राजारामबापू पाटील जनता पक्षात प्रवेश करून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसंतदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सभापती विलासराव शिंदे यांना उभे करून राजारामबापू पाटील आणि शेकापचे प्रा. एन.डी. पाटील यांचा वाळवा विधानसभा मतदारसंघातून पराभव घडवून आणला.                                            हा सर्व इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. वारणा धरण दादांचा आग्रह होता त्याप्रमाणे चांदोली येथे ३६ टीएमसीचे झाले. खुजगावचा आग्रह सोडण्यात आला.  मात्र राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव जयंत पाटील यांनी हा आपल्या वडिलांचा राजकीय अपमान होता, असे मनाशी खुणगाट बांधून कायम राजकारण करीत राहिले. यासाठी त्यांनी उघड नसला तरी सुप्तपणे वसंतदादा पाटील यांच्या पश्चात देखील वारसदारांना विरोध करीत राहिले. त्याचाच भाग म्हणून सांगली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची युती करून जयंत पाटील यांनी निवडणूक लढवली आणि नेहमीच वसंतदादा पाटील आणि त्यांच्या वारसदारांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व असलेल्या महापालिकेवर आपला झेंडा लावला.

राजकीय कुरघोडी करून निवडणुका जिंकल्या. पण सांगलीला आणि सांगलीकर जनतेला त्यांना आपलेसे करता आले नाही. पुढे त्यांचा  पराभव झाला आणि जयंत पाटील यांचे राजकारण त्यांच्या वडिलांच्या पूर्वाश्रमीच्या वाळवा या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिले. ही सर्व राजकीय वादाची पार्श्वभूमी असताना जयंत पाटील मात्र तो वाद विसरायला तयार नाहीत. आम्ही  दादा- बापू यांचा वाद कधीच विसरलो आहोत, तुम्ही देखील विसरा असे डोळ्यात अश्रू आणून विशाल पाटील सांगत होते तेव्हा हा सारा इतिहास ताजा झाला.                                     वास्तविक वारणा धरणावरून वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यामध्ये झालेला वाद हा इतिहासातील सोनेरी पान आहे. कारण त्या काळामध्ये नव स्वतंत्र झालेला भारत देश घडवण्याचे नियोजन होत होते. त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये कोयना धरणाची उभारणी झाली आणि पुढील टप्प्यांमध्ये वारणा आणि दूधगंगा धरणांची उभारणी होणार होती. ते धरण किती मोठे असावे, किती क्षमतेने पाणी साठा व्हावा, पाण्याची गरज किती आहे अशी ती सर्व चर्चा होती. याच्यावर पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पीएचडीसाठी प्रबंध लिहिला आहे. त्या प्रबंधाचे रूपांतर पुढे पाण्याचे राजकारण या  पुस्तकांमध्ये केले आहे. चांदोली धरणाचा वाद असे प्रकरण त्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सर्व बारीक-सारीक तत्कालीन घटना, घडामोडी, भूमिका आणि धोरण याची नोंद आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील तो एक ठेवा आहे. तो वाद सत्तेसाठी नव्हता, तर विकासासाठी आग्रह होता. संघर्ष जरी झाला असला तरी तो एकमेकांच्यावर कुरघोडी करण्यासाठी निश्चितच नव्हता. म्हणूनच त्याचे वर्णन आता महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान असेच करावे लागेल. तो प्रतिसरकारच्या रणभूमीवर झालेला वाद आहे.त्याच्याकडे कधीही नकारात्मक कोणी पाहू नये.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vasantdada Patilवसंतदादा पाटील