इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील निवृत्त लष्करी जवानास बंगला विकत देण्याचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठकसेन मारुती जाधवला येथील न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गेल्या ११ ऑगस्टपासून तो विविध फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहे.
याबाबत जवान विलास बजबळकर (६५) यांनी मारुती अरुण जाधव (२९, लोणार गल्ली, इस्लामपूर) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. यापूर्वी त्याच्या सख्ख्या बहिणीने १३ तोळे दागिने घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. त्यानंतर बेकायदा बचतगट स्थापन करून कष्टकरी महिलांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत तेजश्री पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
बजबळकर यांना १७ लाख रुपयांचा बंगला विकत देतो असे सांगत मारुती जाधवने त्यांच्याकडून गेल्यावर्षी पाच लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत हा व्यवहार झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयपाल कांबळे अधिक तपास करत आहेत.