प्रताप महाडिक : कडेगाव , तालुक्यातील ५५ पैकी २२ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. परंतु बांधकाम विभागाने यापैकी एकाही गावात योजनेची कामे सुरू केली नाहीत. यामुळे २२ गावांतील ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.तालुक्यातील ३३ गावांमध्ये पंचायत समितीकडून रोजगार हमी योजनेची कामे केली जातात. या गावांमधील रोजगार हमी योजनेची कामे सुरळीतपणे सुरू आहेत. सध्या पंचायत समितीकडून १४ कामे सुरू आहेत आणि १६२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र त्यांच्याकडील कडेगाव, निमसोड, सोहोली, शिवाजीनगर, नेर्ली, येडे, अपशिंगे, खंबाळे औंध, कोतवडे, कडेपूर, रायगाव, हिंगणगाव खुर्द, चिखली, तडसर, हिंगणगाव बुद्रुक, ढाणेवाडी, उपाळे वांगी, येतगाव, वाजेगाव, कान्हरवाडी, आसद या गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे केली नाहीत. याबाबत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती. परंतु तरी या अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेची कामे केली नाहीत.कारवाईची मागणीसार्वजनिक बांधकाम विभागावर महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविणे बंधनकारक आहे. परंतु येथील अधिकारी जबाबदारी झटकून कामांचा प्रस्तावच घेत नाहीत आणि घेतला तरी कामे मंजूर करीत नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बांधकाम विभागाची ‘मनरेगा’कडे पाठ
By admin | Updated: July 27, 2014 22:58 IST