लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान लोहमार्गाची चाचणी रविवारी होणार आहे. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा आयुक्तांचा दौरा जाहीर झाला असून स्वत: या मार्गावर चाचणी घेतील.
सकाळी सात ते नऊ या वेळेत ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान लोहमार्गाची चाचणी होणार आहे. चाचणीसाठीची एक्स्प्रेस जास्तीजास्त गतीने पळवून रुळांची मजबुती पाहिली जाईल. त्याशिवाय आळंदी ते शिंदवणेदरम्यान विद्युतीकरणही तपासले जाणार आहे. विद्युत इंजीन ११० ते १२० किलोमीटर प्रतितास गतीने पळवले जाईल.
पुणे ते मिरज लोहमार्गाचे बहुतांश दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले आहे., पण पूर्णत: विजेवर रेल्वे अद्याप सोडली जात नाही. भुयारी मार्गांच्या ठिकाणी विद्युतीकरण अपूर्ण आहे. तेथे लोहमार्गाचे दुहेरीकरणही झालेले नाही. त्यामुळे काम पूर्ण झाले असेल तेथेच सध्या दुहेरी मार्गाचा वापर सुरू आहे. लॉकडाऊन काळात ताकारी ते भवानीनगरचे काम पूर्ण करून घेण्यात आले. त्याची चाचणी रविवारी होईल. ती यशस्वी झाल्यास प्रवासी व मालगाड्या धावण्यासाठी सुरक्षा आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळेल. चाचणीसाठी पुणे विभागीय व्यवस्थापक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत.