दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील निंबाळकर तलावात येणाऱ्या टेंभू योजनेच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून अवघ्या पंधरा दिवसांत टेंभूचे पाणी तलावात सोडण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी शुक्रवारी दिली.
कुलकर्णी शेत परिसरात बंधाऱ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बाबर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून दिघंचीच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता. यासाठी सरपंच अमोल मोरे यांनी पाठपुरावा केला हाेता. दिघंचीच्या निंबाळकर तलावासह
डुक्कर खिळा व सागरमळा या दोन्ही बंधाऱ्यांचे काम पूर्ण होत आले असून, याठिकाणीही लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
तानाजी पाटील म्हणाले, दिघंची येथील निंबाळकर तलावात पंधरा दिवसांत पाणी येणार असल्याने दिघंचीतील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. दिघंचीकरांची पाण्यासाठीची वणवण कायमची संपणार आहे.
सरपंच अमाेल माेरे म्हणाले, आमदार अनिल बाबर, तानाजीराव पाटील यांच्यामुळे दिघंचीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
यावेळी विकास मोरे, बाळासाहेब होनराव, राजेश नांगरे, श्रीरंग शिंदे, योगेश नष्टे, दादासाहेब कुचेकर, संजय वाघमारे, मुन्ना तांबोळी, महेश साळी, संतोष पुजारी आदी उपस्थित होते.