ओळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, विलास कांबळे, विकास मगदुम, विठ्ठल शिंगाडे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर पक्षाला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदस्य नोंदणीला रविवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगितले.
मनसेच्या जिल्हा कार्यालयात उद्योजक परशु साबळे, केदार खापरे, राधिका लोंढे यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सावंत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षाकडे तरुणांचा मोठा ओढा आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांवरील विश्वास उडाला आहे. वीजबिल माफी, शेतकऱ्यांची कर्जमाफीसह अनेक मुद्द्यावर सरकारने फसवणूक केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले आहे. त्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे. अशा स्थितीत जनतेलाही पर्याय देण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात दहा हजार सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी होईल. दुर्गम भाग तसेच इंटरनेट नसलेल्या भागात ऑफलाइन नोंदणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विलास कांबळे, विकास मगदुम, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, जय कुलकर्णी, कुमार सावंतसह शेकडो नागरिक उपस्थित होते.