सांगली : थकित एलबीटी वसुलीसाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. नोंदणी व कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी तयार करून दुकाने सील करण्याच्या हालचाली सुरू आहेत. येत्या चार दिवसात कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या दोन वर्षात आठ हजार व्यापाऱ्यांपैकी साडेचार हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली असून कराचा भरणा केला आहे. राज्य शासनाने दंड व व्याज सवलतीसाठी अभय योजना लागू केल्यानंतर दोन हजार व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले आहे. त्यातून महापालिकेला २१ कोटीचा कर तिजोरीत जमा झाली आहे. अजूनही साडेतीन हजार व्यापारी नोंदणी व करापासून अलिप्त राहिले आहेत. शासनाने अभय योजनेला मुदतवाढ न दिल्याने आता महापालिकेने थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जप्तीपूर्व नोटिसा दिलेल्या व्यापाऱ्यांवर सुरूवातीला कारवाई होईल. नोंदणी व कर न भरलेल्या व्यापाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांची यादी निश्चित झाल्यानंतर तीन पथकाद्वारे कारवाई हाती घेतली जाणार आहे. दुकाने सील करण्यात येणार आहेत. येत्या तीन ते चार दिवसात थकित व्यापाऱ्यांविरोधात वसुली मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हयगय नको : महापौरएलबीटी थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी हयगय करू नये. तीनही शहरात तीन ते चार पथके नियुक्त करून व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन वसुली करावी, असे आदेश महापौर विवेक कांबळे यांनी दिले.
व्यापाऱ्यांवर दोन दिवसात कारवाई
By admin | Updated: September 1, 2015 22:17 IST