फोटो ओळ : माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर दाखल गुन्ह्यांच्या निषेधार्थ जत येथे भाजपच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : उमदी पोलीस ठाण्यात माजी आमदार विलासराव जगताप व त्यांचे पुतणे यांच्यावर दाखल झालेल्या खोटया गुन्हयांची चौकशी करावी, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदारांवर कार्यवाही करावी, त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर शनिवारी भाजपच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आले.
स्थानिक आमदार व मंत्र्यांच्या दबावाखाली दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावेत, माजी आमदार विलासराव जगताप यांचे पुतणे मुरलीधर जगताप यांच्या फिर्यादीतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी माजी आमदार जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
आमदार विक्रम सावंत यांच्याकडून सुडाचे राजकारण सुरू असून, त्यांच्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून माजी आमदार जगताप यांच्यावर कारण नसताना गुन्हा दाखल केला आहे. विकासकामे न करता राजकीय सूडबुद्धीने आ. सावंत राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी केला आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, अण्णा भिसे, संग्राम जगताप, सद्दाम आत्तार, उमेश सावंत, प्रमोद सावंत, शिवाप्पा तावंशी उपस्थित होते.