ओळी :- ॲपेक्स रुग्णालयाच्या डाॅक्टरांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे दीपक माने यांनी उपायुक्त राहुल रोकडे यांना दिले. यावेळी अमित भोसले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेली दीड वर्षे अपेक्स कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्यामुळे मृत्यू झाले आहेत. त्याची चौकशी करून डाॅक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस दीपक माने यांनी जिल्हाधिकारी, पोलीस व महापालिकेकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी सर्वच कार्यालयांना दिले. माने म्हणाले की, अपेक्स कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर निष्काळजीपणे उपचार केले जात होते. या रुग्णालयातील डाॅक्टरांवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात महापालिकेनेही रुग्ण व जिल्हा प्रशासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे; पण ही कारवाई पुरेशी नाही. आतापर्यंत रुग्णालयात झालेल्या उपचाराची चौकशी झाली पाहिजे. चुकीच्या उपचारामुळे मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या ॲपेक्स रुग्णालयाच्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा, त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. यावेळी अमित भोसले उपस्थित होते.