सांगली : वसंतदादा कारखान्यासमोर उभारलेल्या मुव्हेबल खोक्यांसमोरील फुटपाथवर खाद्यविक्रेत्यांनी टेबल थाटल्यामुळे रस्त्याच्या मध्यापर्यंत वाहनांचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे होत आहेत.
मुव्हेबल खोकी पुनर्वसन केल्यानंतर संबंधित खोकीधारकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचे काम सुरू केले आहे. फुटपाथचा वापर आता व्यवसायासाठी केला जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ खाण्यासाठी येणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. वाहतुकीला अडथळा होत असताना हे व्यावसायिक पार्किंगबाबत कोणतीही सूचना करताना दिसत नाहीत. त्यामुळे बेशिस्तपणा वाढला आहे. वसंतदादा कारखान्यासमोर अगदी रस्त्याच्या मध्यापर्यंत पार्किंग केले जात आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री १०पर्यंत हा प्रकार सुरू असतो. त्यामुळे या काळात दोन्ही बाजुंनी येणाऱ्या तसेच शांतिनिकेतनकडून येणाऱ्या वाहनांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना वाहतूक पोलिसांचे. माधवनगर जकात नाक्यापर्यंत वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र, या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे वाहनधारक व परिसरातील नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.