ही महिला दि. १४ एप्रिलरोजी उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी ती आठ महिन्यांची गरोदर होती. गरोदर असल्यामुळे तिच्या काही तपासण्या केल्या केल्या. तेव्हा नाळ खाली सरकल्याचे निदर्शनास आले. दि. २० एप्रिलरोजी प्रसूतीकळा जाणवू लागल्या व अंगावरून रक्तस्राव झाला होता. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने बाळासह आईचे प्राण वाचवणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे डॉक्टरांनी सिनर्जी हॉस्पिटलचे चेअरमन व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांना तातडीने कळवले. त्यांच्या सूचनेनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भोसले व डॉ. रिनाज पटेल यांनी ताबडतोब प्रसूती करण्याचे ठरवले.
शस्त्रक्रियेदरम्यान बाळाची वार तुटली असून, वारेमध्ये रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांना आढळून आले. बाळाभोवती नाळ अडकली होती. अशा अवघड परिस्थितीमध्ये या महिलेची प्रसूती वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन जंगम, डॉ. भोसले व डॉ. रिनाज पटेल यांनी यशस्वीपणे पार पाडली. कोविड सेंटरमध्ये जबाबदारी पार पाडत असलेले डॉ. अदिती फल्ले, डॉ. रोहित चढ्ढा, डॉ. राहुल सुर्वे यांच्या प्रयत्नामुळे, शस्त्रक्रियेनंतर महिला व बाळ दोन्ही सुखरूप असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. सिनर्जी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल सर्व डॉक्टर्स, नर्सिंग कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.