लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने मंगळवारी सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले.
सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
युवक राष्ट्र विकास सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी सदामते म्हणाले की, ॲट्रॉसिटी कायद्याचा अवमान करून चिथावणीखोर भाषण करणाऱ्या गायकवाड यांच्याविरोधात शासनाने तातडीने चौकशी करावी. त्यांची पक्षातून हकालपट्टीही करावी. जातिजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा होतच असते. त्यामुळे त्याविषयी अकारण संशयाचे वातावरण गायकवाड यांनी निर्माण केले आहे. शासनाने कारवाई न केल्यास आम्ही गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोद मोरे, मनीषा बने, अतुल रूपनर, दीपाली वाघमारे, अशोक पवार, अतुल बामणे, गणेश वायदंडे, गणेश जाधव, महेश चेंडके, आदी सहभागी होते.