विकास शहा शिराळा : जांभळेवाडी (ता.शिराळा) येथील स्वरुपा महादेव हवालदार हिने कोणताही क्लास न लावता फक्त ऑनलाईन मार्गदर्शनावर आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इंडियन आर्मीत लेफ्टनंट पद मिळवून लहानपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले. त्यासाठी तीने तीन वर्षे अथक प्रयत्न केले. आठ वेळा अपयश पचवून नवव्यावेळी आपल्या कर्तृत्वाने यशाचा झंडा फडकवला.स्वरूपाचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जांभळेवाडी या छोट्याशा खेडेगावात झाले. माध्यमिक शिक्षण कन्या शाळा शिराळा, उच्च माध्यमिक शिक्षण इचलकरंजी येथे तर मेकॅनिकल इंजिनिअर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट टेक्निकल कॉलेज बिबवेवाडी पुणे येथे पूर्ण झाले. कॉलेज कॅम्पस मार्फत जिंदाल (JSW)बेल्लारी येथे दोन वर्षे नोकरी केली. माध्यमिक शिक्षण घेत असताना इंडियन आर्मी टेक्निकल ऑफिसरसाठी स्वतः माहिती घेऊन आर्मी ऑफिसर बनण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी सातत्याने सलग तीन वर्षे कसोशीने प्रयत्न चालू होते. त्यासाठी ऑनलाईन कोचिंग मार्फत मार्गदर्शन घेतले.इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यासाठी परीक्षा दिल्या. मात्र त्यासाठी कोणत्याही अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतले नाही. आठ वेळा पदरी निराशा आली. मात्र तरी ही आपल्या ध्येया पासून तीने आपले मत विचलित केले नाही. किती ही अपयश आले तरी माघार घ्यायची नाही असा तीने मनाशी ठाम निर्णय घेतला होता. अनेक प्रयत्नानंतर अखेर नवव्या वेळी या इंडियन आर्मी लेफ्टनंटच्या स्पर्धा परिक्षेत यशस्वी झाली. आपले स्वप्न सत्यात उतरवले. तीचे आई, वडील प्राथमिक शिक्षक आहेत. तिच्या निवडीने शिराळा तालुक्याच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.
आर्मी इंडियन मध्ये लेफ्टनंट पदावर निवड होण्यासाठी मी तीन वर्षे प्रयत्न करत होते. टेक्निकल विभागातून आर्मी अधिकारी होता येते याची माहिती मिळवून त्यासाठी प्रयत्न केले. कर्नाटक येथील जिंदाल कंपनीत असताना इंग्रजी भाषेचा माझा सराव झाला. त्याचा फायदा मुलाखती वेळी झाला. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मला हे यश प्राप्त झाले. यासाठी माझ्या आई-वडिलांनी पूर्णपणे सहकार्य केल्याने मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची उत्तम संधी मिळाली - स्वरूपा हवालदार (लेफ्टनंट)