सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या नागेवाडी आणि तासगाव कारखान्यांची थकीत ऊस बिले मिळावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविवारी मोर्चा होता. या माेर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा मंगळवार, दि. १७ रोजी निघणार आहे, असे अध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले.
खराडे म्हणाले की, प्रशासन आणि राजकीय कितीही दबाव असला तरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलने करतच राहणार आहे. बळाचा वापर करुन शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. म्हणूनच रविवार, दि. १५ ऑगस्टऐवजी मंगळवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. हा मोर्चा सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी १० वाजता प्रारंभ होईल व तेथून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.