तासगाव कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी ७ जून रोजी तासगाव शहरात रास्ता रोको करून खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोरही आंदोलन केले होते. यावेळी पुढील चार ते पाच दिवसांत बिले देण्याचे आश्वासन संजय पाटील व कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिले होते. ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. यानंतर १८ जून रोजी दुसरे निवेदन देऊन २१ जूनला आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला हाेता. यावेळीही कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी २० जून रोजी बैठक घेतली होती. बैठकीत खोटे धनादेश दाखवून दोन दिवसांत सर्व बिले जमा करू, असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.
त्यामुळे गुरुवारी तहसीलदार कार्यालयासमोर स्वाभिमानीचे पदाधिकारी उपोषणास बसणार आहेत. तत्पूर्वी तासगाव शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आले आहे.