विटा : खासदार संजयकाका पाटील यांच्या नागेवाडी (ता. खानापूर) येथील साखर कारखान्याने जानेवारीपासून गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता अद्यापही दिलेला नाही. आठवड्यात ऊस बिल द्यावे, अन्यथा कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सोमवारी विटा येथे दिला.
खराडे म्हणाले, नागेवाडी येथील यशवंत कारखाना पूर्वी सहकारी होता. तो कारखाना खासदार पाटील यांनी विकत घेतला आहे. या कारखान्याने हंगामात एक लाखाहून अधिक टन ऊसगाळप केले आहे. डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे प्रतिटन २५०० रुपयेप्रमाणे ऊस बिल दिले आहे.
वास्तविक सुरुवातीला खासदार पाटील यांनी २७५० रुपयांप्रमाणे दर देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, डिसेंबरअखेर प्रत्यक्षात अडीच हजार प्रतिटन दर दिला आहे. जानेवारीपासून मार्चपर्यंत गाळप झालेल्या उसाचे बिल अद्यापही दिलेले नाही. शेतकरी वारंवार हेलपाटे मारत आहे. हे बिल आठवडाभरात तातडीने बँक खात्यावर वर्ग करावे अन्यथा नागेवाडी येथे कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
चौकट
२० एप्रिलपर्यंत बिले देणार
कारखाना गेल्या हंगामात बंद होता. आता अडचणींना सामोरे जात तो सुरू ठेवला आहे. जानेवारीनंतर गाळप झालेल्या उसाचे बिल येत्या २० एप्रिलपर्यंत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. व्यवस्थापनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन कार्यकारी संचालक आर.डी. पाटील यांनी केले.