तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारित मार्केटमधील गाळे वाटप मंजुरीस स्थगिती देणयात आली आहे. प्रशासक आणि सहायक निबंधक शंकर पाटील यांनी ही कारवाई केली असून, त्यामुळे विस्तारित मार्केटमधील सदोष कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा आरोप काँगे्रसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगली-तासगाव रस्त्यालगत नवीन विस्तारित मार्केट यार्ड उभारण्यात येत आहे. या उभारणीसाठी ६४ कोटी ४० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. बाजार समिती स्वनिधी, गाळे लिलावातून जमा झालेली अनामत रक्कम आणि कर्जाची सोय करुन, या मार्केट यार्डची उभारणी करण्याचे नियोजन आहे. बाजार समितीकडून परवानाधारक व्यापाऱ्यांसाठी ९६ गाळे आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अशाप्रकारे नियमात कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना, सर्व नियम धाब्यावर बसवून, व्यापारधार्जिणेपणा दाखवत मोक्याच्या ठिकाणचे सर्व गाळे व्यापाऱ्यांना मॅनेज करुन देण्यात आले आहेत. याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात आला होता. पणन संचालकांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासक शंकर पाटील यांनी ही प्रक्रिया स्थगित केली आहे. गाळा मंजुरीस स्थगिती दिल्याबाबतचे पत्र संबंधित निविदाधारकांना पाठविले असल्याची माहिती महादेव पाटील यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)
गाळे वाटप मंजुरीस स्थगिती
By admin | Updated: May 26, 2015 00:55 IST