लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : धुळगाव (ता. तासगाव) येथे मोबाईल विक्रीच्या तयारीत असलेल्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. अनिल विश्वास चौगुले (वय ४५, रा. डुबल धुळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ३९ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल चोरीचे की अन्य कुठले याचा तपास पोलीस करत आहेत.
एलसीबीचे पथक तासगाव तालुक्यात गस्तीवर असताना, पथकातील अजय बेदरे यांना माहिती मिळाली की, धुळगाव येथे एकजण पिशवीत मोबाईल घेऊन विक्रीच्या उद्देशाने फिरत आहे. पथकाने सापळा लावून चौगुले यास ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे १४ मोबाईल आढळून आले. हे मोबाईल कुठले याबाबत त्याच्याकडून समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे त्यास तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत. एलसीबीेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.