संख : जत तालुक्यातील तोळबळवाडी (मुंचडी) येथील अरुण श्यामू मलमे (वय २०) या युवकाचा ३० रुपये मागितल्याच्या कारणावरून गळा आवळून, लाथाबुक्क्यांनी मारून मंगळवारी खून केला होता. याप्रकरणी संशयित रमेश फकिराप्पा पाटोळे (वय २५) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ४८ तासांत मुचंडीलगतच्या तांदुळवाडीत अटक केली. एक जण बेपत्ता असून, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
तोळबळवाडी येथे अरुण शेती व्यवसाय करतो. सुधीर पाटोळे व रमेश पाटोळे हे दोघे जण अरुणचे मित्र आहेत. मंगळवारी दिवसभर दरीबडचीत तिघांनी एकत्र शिंधी प्याली होते. शिंधीचे ३० रुपये अरुणने दिले होते. ते पैसे गावात गेल्यावर रमेशने देतो म्हणून सांगितले होते.
सायकांळी सुधीर, रमेश, मयत अरुण तिघे कन्नड शाळेजवळ थांबले असताना अरुणने रमेशकडे ३० रुपयांची मागणी केली. रमेेशला पैसे मागितल्याचा राग आला. या कारणावरून त्या दोघांत भांडण झाले.
रमेशने अरुणचा गळा धरून लाथाबुक्क्यांनी मारले होते. छातीवर लाथा, बुक्क्यांनी मारले. त्यामध्ये अरुणचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर रमेशने पलायन केले होते.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली होती. राजू शिरोळकर यांना रमेश उसात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शिताफीने त्याला शुक्रवारी अटक केली. संशयित रमेश फकिराप्पा पाटोळे याला अटक करून कवठेमहांकाळ न्यायालयात उभे केले असता सोमवारी २४ तारखेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाने राजू शिरोळकर, जितेंद्र जाधव, राजू मुळे, अमसिद्धा खोत यांच्या पथकाने कारवाई केली.