पलूस पोलीस ठाण्याचे वतीने पूरग्रस्त गावातील आपत्ती व्यवस्थापन कमिट्यांची बैठक गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.
संभाव्य महापुराच्या अनुषंगाने पलूस पोलीस ठाण्यांमार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, संगीता माने यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
पुराच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर स्थलांतरित नागरिकांचे यादी तयार करणे, ज्या ठिकाणी नागरिक स्थलांतरित करावयाचे आहेत त्या ठिकाणी वीज, पाणी व इतर व्यवस्था करणे, जनावरे व नागरिक यांना वेळीच स्थलांतरित करणे, कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षता घेणे, कोणीही अफवा पसरवणार नाही त्याबाबत दक्षता घेणे, पुलावर पाणी आल्यास वाहतूक तत्काळ बंद करणे, तसेच महापूर येऊन गेल्यानंतर घ्यावयाची दक्षता व उपाययोजना याबाबत सूचना देण्यात आल्या.
बैठकीस आमणापूर, बुर्ली, नागराळे, पुणदी, पुनदीवाडी, दुधोंडी, तुपारी, दह्यारी, घोगाव येथील महापूर आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील उपस्थित होते.