अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांत ४१ लाख ४४ हजार ३०१ टन उसाचे गाळप करून ४१ लाख ८२ हजार ४४४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे उसाची पुरेशी वाढ झाली नाही. तसेच जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रातही २० टक्के घट झाली आहे. यामुळे सर्वच कारखानदारांना गळीत हंगाम मार्चपर्यंत चालवणे कठीण झाल्याचे साखर कारखानदारांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.मान्सून आणि परतीचा मान्सून दोन्ही पाऊस जिल्ह्यात धोधो कोसळले. त्यानंतरही बराच काळ ढगाळ हवामान राहिले. या सर्व वातावरणातील बदलामुळे उसाची पुरेशी वाढ झाली नाही. जिल्ह्यात २०२३-२४ च्या गळीत हंगामात एक लाख ४४ हजार १२७ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये सात हजार हेक्टर क्षेत्राने घट होऊन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये एक लाख ३७ हजार १०४ हेक्टर झाले आहे. या सर्वांचा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी ४१ लाख ४४ हजार ३०१ टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख ८२ हजार ४४४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या कारखान्यांचा साखर उतारा ११ ते १२.८८ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करून दीड ते दोन महिने झाले आहेत. ऊस पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे कारखान्यांचे गळीत हंगाम १५ मार्च २०२५ पर्यंतच चालतील, असे साखर उद्योगातील जाणकारांचे मत आहे. जवळपास ८ ते १० लाख टनाने उसाचे गाळप घटण्याचाही जाणकारांचा अंदाज आहे. राजारामबापू कारखान्याच्या चार शाखांनी आतापर्यंत सात लाख ५३ हजार ५०० टन उसाचे गाळप करून आठ लाख ३६ हजार १८० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सोनहिरा कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून पाच लाख चार हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यानंतर क्रांती, वसंतदादा, हुतात्मा, सद्गुरु श्री श्री शुगर, उदगिरी शुगर, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया या कारखान्यांनीही गळीत हंगामाला गती दिली आहे.
आठ लाख टनापर्यंत गाळप कमी होणार : आर. डी. माहुलीअतिवृष्टी आणि ढगाळ हवामानामुळे उसाच्या उत्पादनात घट येणार आहे. तसेच उसाचे क्षेत्रही जवळपास १० हजार हेक्टरपर्यंत जिल्ह्यात घटले आहे. यामुळे ऊस उपलब्ध करण्यासाठी सर्वच कारखान्यांची धावपळ सुरू झाली आहे. म्हणूनच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे १५ मार्चपर्यंतच गळीत हंगाम चालणार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांचे आठ लाख टनापर्यंत गाळप कमी होईल, असा अंदाज राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी व्यक्त केला आहे.