दत्ता पाटील - इस्लामपूर -जिल्हा बँक निवडणुकीत तासगाव तालुक्यात सोसायटी गटात स्पष्ट बहुमत असतानादेखील राष्ट्रवादीवर पराभवाची मोठी नामुष्की ओढवली आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि सुंदोपसुंदीने राष्ट्रवादीला धक्का बसला असून एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजपची भूमिकादेखील संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. या कलहाचा काँग्रेसला मात्र चांगलाच लाभ झाला असून, तुटपुंजे मतदान असतानादेखील त्यांना विजयाची लॉटरी लागली आहे.माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेतेही पहिल्यांदाच जिल्हा बँकेसारख्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात होते. मात्र उमेदवारी वाटपातूनच राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आळवला.काहींनी उघड, तर काहींनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. आर. आर. पाटील असते, तर असे झाले नसते, असाच सूर बहुतांश कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होता. ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलून सतीश पवार या दुसऱ्या फळीतील तरुण कार्यकर्त्याला सोसायटी गटातून पहिल्यांदाच संधी देण्यात आली होती. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे शेतकरी सहकारी पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत होते. तालुक्यात काँग्रेसची ताकद नगण्य असल्यामुळे, तसेच बहुतांश सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळे सतीश पवार यांचा विजय निश्चित मानला जात होता. एवढेच नव्हे, तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा होत असताना, तासगाव सोसायटी गटातून पवार यांचा पराभव होईल, असे कोणत्याच दिग्गज नेत्याला वाटत नव्हते. किंबहुना इथला निकाल एकतर्फीच होणार, असे चित्र दिसत होते. मात्र राष्ट्रवादीत उमेदवारी डावलल्यामुळे झालेले नाराजीचे नाट्य, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या मांजर्डे, विसापूर सर्कलमध्ये नेत्यांच्या झालेल्या तहाच्या घडामोडी, ज्येष्ठ नेत्यांची नाराजी, आर. आर. पाटील यांच्या माघारी कार्यकर्त्यांची मोळी टिकवून ठेवण्यात नेतृत्वाला आलेले अपयश, भाजपकडून झालेला दगाफटका या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीला धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच स्पष्ट बहुमत असतानादेखील राष्ट्रवादीला हक्काची जागा गमवावी लागली आहे.हा पराभव तालुक्याच्या भविष्यातील राजकारणाची नवी नांदी ठरणार, हे निश्चित. दुसरीकडे राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीचा फायदा घेत केवळ चार सोसायट्यांवर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रताप पाटील यांनी ४१ मते मिळवत विजय पदरात पाडून घेतला.निवडणुकीत जय-पराजय हा ठरलेलाच असतो. पण जिल्ह्यात परिस्थिती अनुकूल असताना तालुक्याच्या हक्काच्या जागेवर पराभव पत्करावा लागतो, त्याची खंत आहे. याचे आत्मचिंंतन करुन सर्वांना विश्वासात घेऊन भविष्यात आवश्यक त्या दुरुस्तीसह वाटचाल करुन पक्ष बळकट केला जाईल.- आमदार सुमनताई पाटील
सुंदोपसुंदीने तासगावात राष्ट्रवादीला धक्का
By admin | Updated: May 8, 2015 00:18 IST