दिघंची -अमोल काटे
शिक्षण घेत असताना आपली खूप मोठी, मोठी स्वप्न असतात. चांगली नोकरी मिळवायची,भरपूर पैसा कमवायचा. हे स्वप्न प्रत्येकाचं असतं. पुढं आपल्याला नोकरी लागते. सुरुवात असते म्हणून आपण उत्साहाने काम करतो. पण, पुढं काही वर्षांनी नोकरीतील आपला उत्साह कमी होतो. यानंतर आपला स्वत:चा व्यवसाय असावा अशी स्वप्न पाहत असतो. स्वप्न पाहतो पण ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न काहीच करत नाही, शेवटी सगळं गणित पैशावर येऊन अडते. पण, तुम्ही जर धाडस केले तर व्यवसाय यशस्वी करु शकतो.
स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी फक्त कागदावर प्लॅनिंग गरजेची नसते. तर यासाठी फक्त सुरुवात करणे महत्वाचे असते. अशीच एका व्यवसायाची सुरुवात करुन मेहनत घेऊन सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका तरुणाने तो व्यवसाय यशस्वी करुन दाखवला. सुरुवातीला काही लाखांचा असणारा व्यवसाय आज ६० कोटींच्या घरात पोहोचला आहे.
या तरुणाचे नाव विक्रम भोसले आहे. भोसले हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची या गावचे आहेत. विक्रम भोसले यांचे पहिली ते सातवी शिक्षण पुजारवाडी येथे झाले, तर दहावीपर्यंत दिघंची हायस्कूल झाले. यानंतर त्यांनी बुधगाव येथे ऑटोमोबाईलचा तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुण्यात ऑटोमोबाईल इंजिनिअर सह एमबीए चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर यांनी नोकरीला सुरुवात केली.
नोकरीमध्ये भोसले यांचं मन काही रमत नव्हते. त्यांना सतत स्वत:चा व्यवसाय असावं असं वाटतं होतं. अखेर एक दिवस धाडस करुन त्यांनी भाड्याने लावण्यासाठी एक टुरिस्ट कार घेतली. त्या कारवर एक ड्राइव्हर ठेवला. तसेच त्यांना शनिवार आणि रविवार कंपनीमध्ये सुट्टी असायची, या दिवशी ते स्वत: ती कार चालवायचे. दोन ते तीन दिवस त्यांनी स्वतःच कर चालवली त्यातून त्यांना चार हजार रुपये मिळाले या व्यवसायात फायदा असल्याचे लक्षात आले. इथंच त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला.
...अन् व्हीआरबी कंपनीचा जन्म झाला
भोसले यांची एकच कार होती, तेव्हा त्यांना चांगला फायदा झाला. म्हणून त्यांनी अजून एक कार घेतली. आपल्या दोन गाड्या सह इतर गाडाच्या माध्यमातून त्यांनी टॅक्सी फॉर शुअर या कंपनीसोबत करार केला. यात त्यांनी दहा गाड्यांचे काम घेतले. एका वर्षात त्यांना ओला आणि उबर कंपन्याची वेंडरशिप मिळाली. २०१५-१६ पर्यंत त्यांच्याकडे चार-पाच गाड्या होत्या. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि पुण्यात वी आर बी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली, त्यानंतर त्यांनी कार्पोरेट प्रवेश घेतला. विविध कंपन्यांना कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी कारची आवश्यकता असते, त्यामुळे कंपनीला कॅब सर्विस देण्याचा निर्णय घेतला.
६० कोटींचा टर्नओव्हर
आज विक्रम भोसले यांनी पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बेंगलोर अशा विविध ठिकाणी आपला उत्कृष्ट पद्धतीने व्यवसाय थाटला आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी सुमारे ५०० पेक्षा जास्त गाड्या आहेत. त्यातील ५० पेक्षा जास्त कॅब या स्वतःचे आहेत. या कंपनीचा टर्नओव्हर २२ कोटी आहे, या कंपनीचा नेटवर्क आज ६० कोटी रुपये आहे.
विक्रम भोसले यांनी गरीबीवर मत करत स्वतःचा व्यवसायात गगन भरारी अशी झेप घेतली आहे. अनेकांना रोजगाराच्या निमित्ताने उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे.
सुरुवातीचा काळ कठीण : विक्रम भोसले
विक्रम भोसले सांगतात, आई, वडील शेतकरी आहेत. घरात कोणीही व्यसनाधीन नाही. पहिल्यापासून अनेक संकटांचा सामना केल्याने गरीबीची जाण होती. पहिल्यापासून अत्यंत हलाकीची परिस्थिती होती. कुटुंबावर वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्यामुळे तसेच घरातील सर्व मंडळींनी मला पूर्णपणे सहकार्य केल्याने मी आज व्यवसायात यशस्वी झालो आहे. सुरुवातीचा काळ थोडा अडचणीचा होता परंतु सध्या अनेक राज्यात कंपनीचे काम जोरात, असंही विक्रम भोसले म्हणाले.