सांगली : जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्याबाबत शिवसेनेने केलेल्या आंदोलनास यश मिळाले असून रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्ट उभारण्यासाठी शासनाने सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत, असे शिवसेनेचे नेते जितेंद्र शहा यांनी सांगितले.शहा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सांगलीतील शिवसैनिकांनी वारंवार दिल्ली दरबारी पत्रक पाठवून केंद्र सरकारकडे सदरच्या ड्रायपोर्टसाठी पाठपुरावा करीत होते. हे ड्रायपोर्ट ताबडतोब तयार झाल्यास निम्मे कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा परिसरातील शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा माल जलदगतीने देश-विदेशात पोहोचणार असल्याने ड्रायपोर्टची नितांत गरज आहे.
तसेच सांगली परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे माल वाहतूक विमानतळ व प्रवासी वाहतूक विमानतळ ड्रायपोर्टच्या धर्तीवर ताबडतोब होणे गरजेचे आहे. यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण व मराठवाडा परिसरातील शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा नाशवंत माल जलदगतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता या ड्रायपोर्टची तातडीने उभारणी करावी.
राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनाने त्यासाठी भरीव मदत द्यावी, असे जितेंद्र शहा, अनिल शेटे, प्रभाकर कुरळपकर, रावसाहेब घेवारे, धर्मेंद्र कोळी, अजिंक्य पाटील यांनी म्हटले आहे.