इस्लामपूर : यश प्राप्तीसाठी कोणताही शॉर्टकट नसतो. यश मिळविण्यासाठी अपार कष्ट आणि आत्मविश्वासाची गरज असते, असे मत पुणे येथील पोलीस निरीक्षक मनमित राऊत यांनी व्यक्त केले.
येथील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम झाला. राऊत यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे यांनी कोरोनाच्या परिस्थितीत खेळता न आल्याने महाविद्यालयीन युवकांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट केले. प्रा. सत्यजित घोरपडे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले.
प्रा. ए. के. पाटील यांनी आभार मानले. प्रा. संदीप पाटील यांनी संयोजन केले.